प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला असला तरी अद्याप मविआतील पक्ष आणि नेत्यांमध्ये योग्य ताळमेळ दिसलेला नाही. अशातच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर रविवारी (३ मार्च) अकोल्यात प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, “आम्ही मविआचे घटक आहोत की नाही याबाबत अद्याप संभ्रमावस्थेत आहोत. आम्ही मविआचे निमंत्रक आहोत की घटक आहोत, हे अद्याप आम्हाला समजू शकलेलं नाही.” प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार आणि मविआचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.