निवडणूक आयोगाने काल (१६ मार्च) लोकसभा निवडणुकीचं वेळापत्र जाहीर केलं. देशभरात १९ एप्रिलपासून सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लावला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदारांची आकडेवारी, मतदान केंद्राची माहिती आणि भारतासारख्या मोठ्या देशात सार्वत्रिक निवडणूक घेतान येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली. भारतातील भौगोलिक आव्हानं पेलत असताना कायदा व सुव्यवस्था आणि निवडणूक यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ईव्हीएमबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.