अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या चिन्हावर (कमळ) निवडणूक लढवणार असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जातप्रमाणपत्राच्या खटल्यात दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. गुरुवारी (१५ मार्च) नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.