बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. विजय शिवतारे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून युतीत बारामती लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे ही जागा मिळाली नाही तर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याला माझी हरकत नाही. मी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहे. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. गेले दोन दिवस विचारमंथन करून, लोकांशी बोलूनच मी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे. महायुतीत जर अशा पद्धतीने निर्णय झाले तर ते सोयीस्कर होतील”