पावसाळी अधिवेशन चालू असून विधानसभेसह विधान परिषदेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ठाकरे गटाचे आमदार) यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळही केली. त्यानंतर भाजपा आमदारांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लगोलग दानवे यांना पाच दिवसांसाठी विधीमंडळातून निलंबित केलं. दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे यांच्या चुकीबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृह, उपसभापती, सभागृहातील महिला सदस्यांची क्षमा मागितली आहे. त्याचबरोबर दानवे यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.