आषाढी वारीची लगबग सुरू झाली आहे. नगरपालिका, पोलीस आणि मंदिर समिती प्रशासन तयारी पूर्ण करत आहेत. त्याप्रमाणेच पांडुरंगाचे कपडे शिवणारे निकते कुटुंबीय तयारीला लागले आहेत. गेल्या सहा पिढ्यांपासून निकते कुटुंब देवाचे वस्त्र शिवत आहे. भजनदास चौकातील निकते कुटुंबीयांचे कपड्याचे दुकान आहे. विविध कपड्यांची निर्मित करण्याबरोबरच पांडुरंगाची वस्त्र बनवण्याचे काम ते करतात. पांडुरंगाला परिधान करण्यात येणारी अंगी बनवण्यात विशेषतः निकते काकांचा हातखंडा आहे.