चिंचवड विधानसभेसाठी भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. विद्यमान अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, चंद्रकांत नखाते पाठोपाठ आता स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर सार्थक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. दोन वेळा नगरसेवक राहिलेले शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेची तयारी सुरू केली आहे. आज पिंपळे सौदागरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना आमदारकी लढवण्यासाठी आग्रह केला. शत्रुघ्न काटे यांनी ही भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त करत चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. पक्षाने काटे यांना चार वेळा डावलले. पक्षावर नाराज असलेले शत्रुघ्न काटे यांनी आता मात्र माघार घेणार नसल्याचे सांगत चिंचवड विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. भाजपकडून अश्विनी लक्ष्मण जगताप, शंकर जगताप, चंद्रकांत नखाते यांच्या पाठोपाठ भाजपमधून शत्रुघ्न काटे इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढू शकते.