IAS पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली.आयएएसमध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झाला आहे.चुकीची कागदपत्र सादर केल्याचा आरोप असून त्याची चौकशी चालू आहे.त्या सर्व घडामोडी दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी पोलीस दाखल झाले.मात्र गेट बंद होते.तसेच आतमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे पोलिसांना पुन्हा एकदा माघारी जावे लागले. या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक एस.शिळीमकर यांनी सांगितलं, “मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी काल आणि आज आमचे कर्मचारी आले होते.मात्र त्या आम्हाला भेटल्या नाहीत.त्यामुळे आम्ही मनोरमा खेडकर यांच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ लागत आहे. त्या आम्हाला भेटल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत.”