निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थमंत्री म्हणून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प Budget सादर केला आहे. बहुमताचा आकडा कायम राखायचा तर येणाऱ्या पाच वर्षांत अशाच प्रकारची कसरत मोदी सरकारला करावी लागेल, असं दिसतंय. कारण तेलगु देसम किंवा जनता दल सयुक्त यांनी पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला तर सरकार नक्कीच डगमगेल. त्यामुळे त्यांनी मागणी करावी आणि केंद्राने ती मान्य करावी, असंच मार्गक्रमण भविष्यात पाहायला मिळेल, याची चुणूकच हा अर्थसंकल्प देऊन गेला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सुद्धा महाराष्ट्राला किंबहुना मुंबईच्या सुद्धा तोंडाला पाने पुसण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं आहे.