मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लढा देत असून राज्यभरात जनजागृती
आणि शांतता रॅली काढत आहे. प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांबाबत भूमिका
मांडत आहेत. त्याच दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मराठा आरक्षणाबाबत तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी त्यांच्या घराबाहेर आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी जवाब दो आंदोलन केलं.