महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व सुपारीबाज हे दोन शब्द गेल्या काही दिवसांत चर्चेत आले आहेत. बीडमधील भेटीदरम्यान राज ठाकरेंच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या आणि ‘सुपारीबाज, सुपारीबाज’ अशा घोषणादेखील दिल्या. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि विरोधी कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर मुलाखतीत म्हणाले की, राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन (भाजपाला) बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेला ते कोणाची सुपारी घेऊन मराठवाड्यात आले आहेत, हे विचारण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. एकूणच गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेकडून मनसेसाठी सुपारीबाज, सुपारी घेणारा पक्ष असे उपहासाने म्हटले जात आहे. या निमित्ताने सुपारी हा शब्द व त्याचा रंजक इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.