मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रविवारी ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केले. यावरून संतप्त झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी नेते कदम यांना प्रत्युत्तर देताना, गेल्या ४० वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार, मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे, असे आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. दरम्यान महायुतीतील नेते प्रवीण दरेकर व आशिष शेलार यांनी रामदास कदम यांच्या विधानावर टीका करत रवींद्र चव्हाणांची पाठराखण केली आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी रवींद्र चव्हाण केवळ कुचकामी नाही तर भ्रष्टाचारी सुद्धा आहे असं म्हणत कदमांची बाजू घेतली आहे. महायुती विरुद्ध महायुती व त्यात महाविकास आघाडी असा हा वाद नेमका काय हे समजून घेऊया.