बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीच्यावतीने आज २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काल याचिका दाखल करण्यात आली होती.या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हा बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.त्यानंतर शांततेत निषेध आंदोलन करण्याचा निर्णय मविआने घेतला.