सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.