अॅना सेबेस्टियन पेरायिल या चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा कामाच्या तणावामुळे मृत्यू झाला आहे. अॅनाने ६ जुलै रोजी सांगितलं की तिच्या छातीत दुखतंय. त्यामुळे तिला पुण्यातील एका रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिचा ईसीजी काढून तपासण्यात आला. हृदयरोगतज्ज्ञांनी तिची तपासणी करून, प्राथमिक उपचार व औषधं देऊन तिला घरी पाठवलं. मात्र तिला कामाचा खूप त्रास असल्याचं, तिची झोप पूर्ण होत नसल्याचं डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितलं. तिला आराम करण्यासही सांगितलं होतं. मात्र हॉस्पिटलमधून अॅना थेट ऑफिसला गेली आणि रात्री उशिरा परतली. नंतर तिची प्रकृती अजून खालावली. हा सगळा त्रास सहन करत ती कामच करत होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू झाला. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या या तरुणीने मार्च २०२४ मध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यात तिचं निधन झालं. मृत तरुणीच्या आईने लिहिलेल्या एका भावूक पत्रामुळे ईवाय कंपनी, तिथल्या कामाची पद्धत चर्चेचा मुद्दा बनली आहे.