पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची पाहण्यास गर्दी झाली होती. तर तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकार्यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले. दरम्यान महापालिकेचा कुठलाही रस्ता खचलेला नाही, असं पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलं आहे.