Akshay Shinde Encounter Case Hearing High Court : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत आरोपी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. अण्णा शिंदे यांनी वकील अमित कातरनवरे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत आपल्या मुलाला चकमकीचा बनाव रचून मारल्याचा आरोप केला आहे. अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.