Kolhapur Murder Case, Cannibalisms: दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून ओळखलं जाणारं २०१७ चं कोल्हापुरातील यल्लवा रामा कोचीकोरवी हत्याकांड आता पुन्हा नव्याने चर्चेत आलं आहे. कोल्हापूरच्या माकडवाला परिसरात राहणाऱ्या, कंगवा फणी विकून लेकरा बाळांना वाढवलेल्या यल्लवा रामा या महिलेला तिच्याच पोटच्या लेकाने चाकूच्या हल्ल्याने संपवलं होतं. बरं इतक्यावरच हा नराधम थांबला नाही तर त्याने चक्क आपल्या आत्ताच्या मृतदेहाच्या शरीरातील एक एक अवयव काढून त्याला तेल मीठ लावून खाण्याचा अविश्वसनीय प्रकार सुद्धा केला होता. या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत फाशीच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा देता येईल का अशा प्रश्नासह याचिका दाखल केली होती. याप्रकरणी अलीकडे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण व न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची काही निरीक्षणं नोंदवत सुनीलला मोठा धक्का दिला आहे. नेमकं सुनावणीदरम्यान असं काय घडलं हे आपण आता पाहूया.