संपत्ती निर्मिती ही सात्विक असू शकते आणि त्यातून समाजाचीही प्रगती साधली जाऊ शकते, हे सिद्ध करणारा एक खूप चांगला अस्सल भारतीय उद्योगपती आपण गमावला, य़ा शब्दांत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्याकडे संपत्ती निर्मितीकडे नकारात्मक दृष्टिकोनाने पाहिलं जातं. या पार्श्वभूमीवर ती सात्विक आणि समाजहिताचीही असू शकते हे सिद्ध करणारे रतन टाटा हे अपवादात्मक उद्योगपती होते. सरकारी धोरणांच्या कलाकलाने आपला उद्योगविस्तार करणाऱ्या व्यापारी मनोवृत्तीच्या भारतीय उद्योगपतींमध्ये म्हणूनच टाटा वेगळे ठरतात. त्यांनी भारतापुरतेच मर्यादित न राहाता कंपनी जागतिक केली. जगातील मोठ्या कंपन्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. त्यांचे महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे ते प्राणीमित्र अर्थात प्राण्यांचे सुहृदही होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राण्यांच्या रुग्णालयाची उभारणीही त्यांनी केली!