Male Wears Female saree For Sheri Garba: बंगालमध्ये केली जाणारी दुर्गा पूजा, महाराष्ट्रात शक्तीपीठ असलेल्या ठिकाणी केली होणारे जत्रोत्सव आणि गरब्याची परंपरा जिथून लोकप्रिय झाली, त्या गुजरातपर्यंत अनेक परंपरा आहेत. अहमदाबाद शहरात अशाच तऱ्हेने सुमारे २०० वर्षांपासून एक परंपरा जोपासली जात आहे. ज्यामध्ये पुरुष महिलांचे वस्त्र घालून गरब्यात सहभागी होतात. अहमदाबादमध्ये नवरात्री दरम्यान एका समाजाचे पुरुष महिलांची घागरा-चोळी, साडी घालून गरबा खेळताना दिसतात. २०० वर्षांपासून ही परंपरा चालत आल्याचे सांगितलं जातं. अहमदाबादच्या ‘साडू माता नी पोल’ येथे ही परंपरा जपली जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच महाष्टमीला बारोट समाजाचे पुरुष महिलांसारखे नटून थटून गरब्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतात. या परंपरेला ‘शेरी गरबा’ असंही तिथं म्हटलं जातं.