Kalyan Dombivali Vidhansabha Elections 2024: डोंबिवली पश्चिमेतील भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्लेखोरांनी अचानक येऊन शिवीगाळ करत कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली असून, उपाध्याय यांना धमक्या दिल्याचेही समजते. तोडफोडीचा हा सर्व प्रकार कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. ही घटना निवडणूक तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. डोंबिवली विधानसभेत भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपेश म्हात्रे उभे आहेत. या दोघांमध्ये तणाव वाढत असल्याचे बोलले जात आहे. डोंबिवली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून, हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.