विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांच्या स्वागताचा उत्साह त्यांच्या जीवावर बेतण्याची घटना कल्याण पश्चिम मतदारसंघात घडली. जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे रात्री उशिरा प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. मात्र, हारासोबत लावलेल्या इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्याला लागली. या कारणाने त्यांच्या केसांनी पेट घेतला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आग विझवली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.