Ajit Pawar on Maharashtra Assembly Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ९ मे २०२४ रोजी अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली होती. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. “अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”, अशा आपल्या शैलीत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक पवार जिंकले की पराभूत झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शनिवारी (२३) रात्री या प्रश्नाचं उत्तर मिळालं. शिरूरमध्ये अशोक पवार पराभूत झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवारांचा ७४,५५० मतांनी पराभव केला आहे. कटके यांना १,९२,२८१ मतं मिळाली, तर अशोक पवारांना १,१७,७३१ मतं मिळाली आहेत.