Sharad Pawar meets Baba Adhav: महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले आहे. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले.