Helmet Compulsion New Rule in Maharashtra: राज्यात दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांच्या अपघाती मृत्यूंची संख्याही अधिक आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशाच्या विरोधात मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२८ आणि १२९ अंतर्गत पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेटचा वापर बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहे. परिणामी, दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशाला हेल्मेट घालणे बंधनकारक असून, ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत.