Raj Thackeray WAQF Amendment bill : केंद्र सरकारने संसदेत मांडलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक अद्याप पारित झालेलं नाही. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. तर, भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांनी हे विधेयक रेटण्याचा प्रयत्न चालवला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. लातूरमधील तळेगावातील घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांनी वक्फ बोर्डाच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की त्यांनी विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. तर, राज्य सरकारला विनंती केली आहे की अहमदपूर तालुक्यातील तळेगावमधील शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. राज यांनी यासंदर्भात विवेचन करणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे.