मध्य रेल्वेच्या एसी ट्रेनमध्ये चक्क एक व्यक्ती नग्न अवस्थेत चढल्याने महिलांचा गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा प्रकार काल सायंकाळी चार वाजून ११ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दिशेने जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये घडला. घाटकोपर स्टेशनदरम्यान ही ट्रेन आल्यानंतर एका नग्न अवस्थेतील व्यक्ती महिलांच्या डब्यात चढला, त्यानंतर महिलांनी मोठा गोंधळ घातला. महिलांचा गोंधळ पाहून तिकीट निरीक्षकाने त्या व्यक्तीला धक्का देऊन ट्रेनच्या बाहेर काढलं. मात्र या घटनेमुळे महिला प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत गर्दी नसतानाही घटना कशी घडली? एसी ट्रेनचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे असा प्रकार कसा घडला, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.