गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राजकीय वातावरण तापलंय. या संपू्ण प्रकरणात एक चर्चेतलं नाव म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराडने हे सगळं घडवून आणलं, तो मुख्य आरोपी असल्याचे आरोप नेते मंडळींकडून केले जात आहेत. पण वाल्मिक कराड नेमके आहेत कुठे याचा कुणालाही ठाव ठिकाणा नव्हता. मात्र ३१ डिसेंबर रोजी अचानक सकाळी बातमी आली ती वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्याची. यासाठी ते पुण्यातील सीआयडी कार्यालयातही स्वतः पोहोचले. पण अशाप्रकारे २२ दिवसांनंतर वाल्मिक कराड यांचं सर्वांसमोर येणं हे आधीच ठरलेलं का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्ट. वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण आल्यानंतर आता नेमकी काय चर्चा सुरू आहे? कोणते दावे केले जात आहेत ते पाहू या.