CM Ladki Bahin Yojna: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहेत.लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते. परंतु निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले आहेत.