Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून आहे. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. राजन साळवी यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. यानंतर आज राजन साळवी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या भेटीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं भाष्य केलं आहे. “विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज आहे. मी माझ्या भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहेत”, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.