बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. सीआयडीचं तपास पथक सध्या त्याची चौकशी करत आहे. वाल्मिक कराडवर खूनाच्या प्रयत्नासह खंडणी, मारहाणीचेही अनेक खटले चालू आहेत. दरम्यान, आता त्याच्या मुलावरही आरोप होत आहेत. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. पीडित कुटुंबाचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.