Mumbai GBS First Death: नायर रुग्णालयामध्ये ५३ वर्षीय व्यक्तीचा गुइलेन-बॅरे सिंड्रोमने (जीबीएस) मृत्यू झाला. मुंबईमधील जीबीएसचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती २८ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. वडाळा येथे राहणारी ५३ वर्षीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात कक्ष सेवक म्हणून कार्यरत होती. त्यांना ताप येत असल्याने २८ जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील पाण्यासह विविध तपासण्या केल्यानंतर त्यांना जीबीएसची लागण झाल्याचे लक्षात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. मात्र सोमवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.