Rishiraj Tanaji Sawant Police Statement: ‘बँकॉकला व्यावसायिक कामानिमित्त (बिझनेस ट्रिप) चाललो होतो,’ असा जबाब खासगी विमानाने मित्रांबरोबर बँकॉकला निघालेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राने, ऋषिराज यांनी पोलीस चौकशीत दिला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचाही जबाब नोंदवून घेतला आहे. ऋषिराज यांचे सोमवारी सायंकाळी अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. हे अपहरण नसून, ऋषिराज दोन मित्रांबरोबर खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर विमान भारतीय हवाई हद्द सोडण्यापूर्वीच माघारी वळविण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास ते पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर ऋषिराज यांच्यासह, बरोबर असलेल्या दोन मित्रांची पोलिसांनी चौकशी केली.