पिंपरी- चिंचवड: हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या आणि रिक्षांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची दापोडी पोलिसांनी भर वस्तीमधून धिंड काढली आहे. नुमान खान, मुजफ्फर कुरेशी आणि सिपटेन खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तोडफोड प्रकरणी फिरोज इर्षात शेख यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
१५ फेब्रुवारी रोजी तिन्ही आरोपींनी मदरसा परिसर आणि पवार वस्ती परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या दोन रिक्षांची तोडफोड केली होती. पाच ते सहा दुचाकींचं मोठ नुकसान केलं होतं. तसंच हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुमान खान, मुजफ्फर कुरेशी आणि सिपटेन खान यांना बेड्या ठोकल्या. घटनास्थळी पवार वस्ती आणि तोडफोड केलेल्या परिसरातून पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.