SSC Students Denied Entry For Paper After Father Demise: नियतीपुढे कुणाचे काहीही चालत नाही. काळ, वेळही कुणासाठी थांबत नसल्याचा जीवनात पदोपदी अनुभव येत असतोच. दहावीची परीक्षा देऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या जीवनात पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही नव्हती. परीक्षेच्या दिवशीच वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा दुःखद प्रसंग विद्यार्थ्यावर ओढवला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावरही वडिलांच्या चितेला अग्नी देऊन विद्यार्थ्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. मात्र, परीक्षेची नियोजित वेळ होऊन गेली होती. अखेर विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर न देताच घरी परतावे लागले. अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड गावात घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे अनेकांना गहिवरून आले होते.