जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारत सरकार आक्रमक झालं आहे. अशातच केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्यास सांगितलं होतं. पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. या मुदतीत, म्हणजेच २३ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले आहेत.