लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा प्रभाव तसेच शिवसेनेचा झालेला दणदणीत विजय यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ाच्या सत्तेची समीकरणे भाजप-शिवसेनेकडे झुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी तीनमध्ये भाजपचे वर्चस्व राहणार आहे. एका मतदारसंघावर शिवसेना झेंडा फडकवेल, असे चित्र आहे. काँग्रेसला दोन, राष्ट्रवादीला एका व शिवसेनेला एका मतदारसंघात अस्तित्वाची प्रखर झुंज द्यावी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीचे व आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या बुलढाणा व मेहकर हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे, मलकापूर व जळगाव जामोद हे दोन भाजपकडे, खामगाव व चिखली काँग्रेसकडे आहेत. एकटा सिंदखेडराजा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. आघाडीला जिल्ह्य़ात अस्तित्वासाठी झुंजावे लागेल.
सिंदखेडराजा मतदारसंघ. मतदारसंघाचे मुख्यालय राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान व छत्रपती शिवरायांचे आजोळ. हा मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वाधिक अविकसित व मागासलेला मतदार संघ. रस्ते व दळणावळणाच्या सोयी नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सिंचनाची सोयीच नाहीत त्यामुळे शेतीतही मागास, उद्योग-व्यापारापासून दूर असलेल्या या जिल्ह्य़ातील सर्वच विधानसभा मतदारसंघात थोडय़ाफार फरकाने अशीच स्थिती आहे..
* बुलढाणा
म्या मतदारसंघात १९९०पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, १९९०, १९९५, २००४, २००९च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारत हा मतदारसंघ बालेकिल्ला बनविला. आताही शिवसेनेच्या विजयराज शिंदे यांची उमेदवारी व विजय पक्का मानला जातो. येथे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी व फूट ही सरळसरळ शिवसेनेच्या पथ्यावर पडते. काँग्रेसमधील बंडाळी शमल्यास आणि राष्ट्रवादीने मनापासून साथ दिल्यास व धृपदराव सावळेंसारखा बहुजन चेहऱ्याचा उमेदवार दिल्यास चुरशीची लढत होईल. मतदारांसमोर मनसेच्या संजय गायकवाड यांचाही पर्याय आहे.
* चिखली
प्रथम ३५ वष्रे काँग्रेसचा, नंतर १५ वष्रे भाजपचा बोलकिल्ला राहिलेल्या चिखली मतदारसंघावर सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र, लोकसभेत या मतदारसंघाने आघाडीला चांगलाच हात दाखविल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपत श्वेता महाले पाटील, संजय चेके, विजय कोठारी, सुरेश अप्पा खबुत्तरे, असे एक नव्हे पंधरा दावेदार आहेत. महायुतीतील स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे प्रबळ दावेदार आहेत. विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे यांच्या विरोधात नकारार्थी वातावरण आहे. महायुतीने प्रभावी उमेदवार दिल्यास राहुल यांना निवडणूक सोपी राहणार नाही.
* सिंदखेडराजा
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ विकासाची दिवास्वप्ने पाहतोय. राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे या मतदारसंघाचे गेल्या वीस वर्षांपासून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व शिंगणेचे कट्टर विरोधक तोताराम कायंदे शिवसेनेत गेल्याने शिंगणेंना जबर धक्का बसला आहे. येथे शिवसेनेचे दावेदार शशिकांत खेडेकर, राजश्री जाधव, संजय जाधव आहेत. भाजपही ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. शिंगणेची एकाधिकारशाही संपविण्याचे येथे विरोधकांपुढे आव्हान आहे.
* मेहकर
मेहकरची निवडणूक एकतर्फी व शिवसेनेच्या पारडय़ात बळ टाकणारी आहे. डॉ. संजय रायमूलकर हे येथे शिवसेनेचे उमेदवार आहेत. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे कट्टर अनुयायी असलेल्या रायमूलकरांना येथे पर्याय दिसत नाही. त्यांच्या विरोधात जागा काँग्रेसकडे गेल्यास लक्ष्मणराव घुमरे, राष्ट्रवादीकडे गेल्यास अॅड. सुमित सरदार उमेदवार आहेत. भारिप-बहुजन महासंघाने प्रकाश गवई यांना उमेदवारी दिली आहे.
* खामगाव
एके काळी भाजपचे वर्चस्व राहिलेला खामगाव मतदारसंघ गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसच्या दिलीप सानंदा यांनी काबीज केला आहे. त्यांना लढत देण्याची राजकीय क्षमता व आर्थिक ताकद भाजपच्या पांडुरंग फुंडकर यांच्यात असली तरी ते पुत्रप्रेमापोटी आकोश फुंडकर यांना पुढे करीत आहेत. येथे काँग्रेसचे दिलीप सांनदा, भारिप-बमसचे अशोक सोनोने व भाजपचे पांडुरंग फुंडकर किंवा त्यांचे पुत्र आकाश फुंडकर अशी तिरंगी लढत होईल. त्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून फुंडकरांनी निवडणूक लढविल्यास काँग्रेसच्या दिलीप सानंदा यांना खूप कसरत करावी लागेल.
* जळगाव-जामोद
जळगाव जामोद निवडणूक जातीय समीकरणावर लढण्याची पूर्वपरंपरा आहे. मात्र, यात विकासाची भर घालत भाजपच्या विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांनी या मतदारसंघावर पंधरा वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. येथे भाजपचे डॉ. संजय कुटे, काँग्रेस आघाडीचे रामविजय बुरुंगुले व भारिप-बमसचे प्रसेनजित पाटील, अशी काटय़ाची तिरंगी लढत होणार आहे. कुटे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे बुरुंगुले व भारिपचे प्रसेनजित पाटील प्रभावी उमेदवार आहेत.
* मलकापूर
हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला. महाराष्ट्र स्थापनेपासून फक्त दोनदाच तेथे काँग्रेसचा आमदार होता. भाजपाने अर्जुनराव वानखेडे, किसनलाल संचेती, दयाराम तांगडे असे चळवळीतील आंदोलनकर्ते आमदार येथे दिले. भाजपाच्या संघटनात्मक बळावर व पुण्याईवर चैनसुख संचेती येथे वीस वर्षांपासून अढळपदावर जाऊन बसले आहेत. त्यांना पराभूत करणे एक आव्हानच आहे. यावेळी काँग्रेस हरिश रावळ किंवा डॉ.अरविंद कोलतेंसारखे प्रभावी उमेदवार त्यांच्या विरोधात देण्याची शक्यता आहे. मात्र, संचेती व संघटनात्मक कौशल्यावर बाजी मारतात त्याच्या पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही.
आघाडीला अस्तित्वासाठी झुंजावे लागणार
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा प्रभाव तसेच शिवसेनेचा झालेला दणदणीत विजय यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ाच्या सत्तेची समीकरणे भाजप-शिवसेनेकडे झुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 24-09-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp alliance struggle for survival in buldhana constituency