‘सकाळी मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती.. त्या दोन देसाईंनी वाट लावली.. आता कामे कशी होणार?’.. सेनेच्या एका नेत्याला आपली उद्विग्नता लपवता आली नाही.. आज जरी विरोधी पक्षात बसलो तरी लवकरच सत्तेच जाऊ.. जी काही मंत्रिपदे मिळतील ती घेऊ’.. सेनेचाच आणखी एका नेत्याने आपलीही अस्वस्थता व्यक्त केली.
विधानभवनात आलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत किमान विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करा असा सेनेच्या नेत्यांचा आग्रह होता तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली तरच विरोधीपक्षनेतेपदाची घोषणा विश्वासदर्शक ठरावानंतर केली जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली. आदल्या दिवशी शिवालयात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांची बैठक घेतली खरी परंतु विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी नेमके काय करायचे हे बुधवारीच कळेल अशी भूमिका घेतली होती. सत्तेत सामील होण्याची ही शवेटची संधी असून विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा द्यावा अशी सेनेच्या काही ज्येष्ठ आमदारांची भूमिका होती.. मिलिंद नार्वेकरांचीही हीच भूमिका असल्याचे एका आमदाराने सांगितले.. नार्वेकरही कधी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत होते तर मधेच रामदास कदम व दिवाकर रावते यांच्याशी संवाद साधत होते.. या साऱ्या प्रक्रियेत सेना नेते सुभाष देसाई नेमके अनुपस्थित होते. सभागृहात अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या ठरावाच्यावेळी ते पक्षकार्यालयात आले.. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला आणि पाठोपाठ विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणाही अध्यक्षांनी केली. यानंतर दिवाकर रावते, रामदास कदम अरविंद सावंत आणि निलम गोऱ्हे यांनी आपली रणनीती यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया दिली. ज्या प्रकारे भाजपने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला त्यावर काय भूमिका घ्यावी याविषयी मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे तसेच काही आमदारांमध्ये थोडीशी चर्चा सभागृहाच्या आवारात सुरू होती तर दुसरीकडे आपल्याला डावलण्यात आल्याची खंत रवींद्र वायकरांच्या चेहऱ्यावर दिसत होती.. रामदास कदम, रावते, सुभाष देसाई की मिलिंद नार्वेकर यापैकी नेमके कोणाचे ऐकायचे हा प्रश्न घेऊनच एकनाथ शिंदे वावरताना दिसत होते. मधेच मातोश्रीवर फोनाफोनी सुरू होती.. अखेर, आत्ता तरी विरोधी पक्षाचीच भूमिका बजावायची हा निरोप मिळाला आणि राज्यपालांची गाडी अडवायला सेनेचे आमदार सज्ज झाले..
विरोधी पक्षनेतेपद मिळूनही सेनेला सत्तेची आस!
‘सकाळी मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती.. त्या दोन देसाईंनी वाट लावली.. आता कामे कशी होणार?'..
आणखी वाचा
First published on: 13-11-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leaders want to join with bjp in assembly