कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे ऊमेदवारी अर्ज दाखल करणारे राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तब्बल २५ गुन्हे दाखल झाले आहेत. दहिहंडी ऊत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषणासंबंधीचे नियम पायदळी तुडवल्याचा गुन्ह्य़ाचाही त्यामध्ये समावेश आहे.
 आव्हाड यांच्या नावे दोन कोटी दोन लाख ३९ हजार दोन रुपयांची जंगम तर चार कोटी १२ लाख ८१ हजार सहाशे पाच रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्याकडे दोन अलिशान वाहने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वादग्रस्त आदर्श वसाहतीतील फ्लॅटचा ऊल्लेख टाळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या आव्हाडांनी यंदा मात्र ‘आदर्श’मध्ये आपल्या नावे फ्लॅट असल्याचे म्हटले आहे.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, ठाणेनगर, मुंब्रा, कळवा, नौपाडा आणि मुंबईतील विक्रोळी यासारख्या पोलीस ठाण्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तब्बल २५ गुन्हे दाखल असले तरी त्यापैकी काही गुन्ह्य़ातून त्यांची निर्दोष सुटकाही झाली आहे. काही गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, जमावबंदी कायद्याचे ऊल्लंघन करणे, मारामारी, धमकाविणे अशा स्वरूपाचे गुन्ह्य़ांची त्यांच्याविरोधात नोंद आहे.
कळवा येथील मफतलाल परिसरातील अनधिकृत झोपडय़ा वाचविण्यासाठी आव्हाडांनी रेलरोको करत प्रवाशांना वेठीस धरले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत मुंब्रा परिसरात रात्री उशीरापर्यंत प्रचार सभा घेऊन आचारसंहितेचा भंग करणे आणि ध्वनीप्रदुषण केल्याप्रकरणीही त्यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पाच वर्षांत मालमत्ता वाढली..
आव्हाड यांची जंगम मालमत्ता दोन कोटी दोन लाख ३९ हजार दोन रुपये इतकी तर स्थावर मालमत्ता चार कोटी १२ लाख ८१ हजार सहाशे पाच रुपये इतकी आहे. दहा लाखांची होंडा सिटी आणि ४५ लाखांची बिएमडब्लू अशी वाहने त्यांच्या नावे आहेत. आव्हाड यांच्यावर ५१ लाख ८२ हजार १६ रुपये इतके कर्ज आहे. तसेच त्यांच्या पत्नी ऋता यांच्या नावावर ३२ लाख ७२ हजार ५३८ रुपये इतकी जंगम मालमत्ता तर तीन कोटी ६९ लाख १५ हजार शंभर रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगी नताशा हिच्या नावावर १२ लाख ७९ हजार ९३९ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. गेल्या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ९३ लाख २६ हजार ९२८ रुपयांची जंगम तर एक कोटी ८६ लाख इतकी स्थावर मालमत्तेची नोंद होती. गेल्या पाच वर्षांत आव्हाड यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट होत आहे.