महाराष्ट्र व हरयाणात सत्तास्थापनेची धामधूम सुरू असताना झारखंड व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. दोन्ही राज्यांमध्ये २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यात मतदान होईल. मतमोजणी २३ डिसेंबरला होणार असून, नवीन वर्षांत दोन्ही राज्यांमध्ये नवीन सरकार अस्तित्वात येईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी झारखंड व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज, शनिवारी दिल्लीत घोषित केला.
दोन्ही राज्यांसमवेत दिल्ली विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल. या तीनही जागांवरील आमदारांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पदाचा राजीनामा दिला होता.विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये हरयाणा व महाराष्ट्रासह विधानसभा निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा इरादा होता. परंतु काश्मीरमध्ये उद्भवलेल्या भयावह पूरस्थितीमुळे हे शक्य होऊ शकले नाही. नक्षलवाद्यांच्या आव्हानाला तोंड देऊन झारखंडमध्ये सुरळीतपणे निवडणूक पार पाडण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. गतवर्षी छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. त्यामुळे काँग्रेससमोर झारखंडची निवडणूक मोठे आव्हान मानले जाते. केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून सातत्याने नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी विविध योजना आखत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील ‘मोदी लाटे’ची झारखंडमध्ये कसोटी लागणार
आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ तर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ८७ जागा आहेत. झारखंडमध्ये काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचे, तर काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसचे सरकार आहे. झारखंडमध्ये एकूण २८ जागा एसटी, तर ९ जागा एससी संवर्गासाठी राखीव आहेत. काश्मीरमध्ये एससीसाठी सात जागा राखीव आहेत. जम्मू -काश्मीरवर भाजपचे विशेष लक्ष्य आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची एकही संधी सोडलेली नाही. महाराष्ट्र, हरयाणातील सत्ता गमावल्यानंतर झारखंड व काश्मीरमध्ये स्थानिक पक्षांसमवेत सत्तेत असलेल्या काँग्रेस नेतृत्वाचा या विधानसभा निवडणुकीत कस लागणार आहे.
झारखंड व जम्मू-काश्मीरमध्ये २५ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानंतर २, ९, १४ व २० डिसेंबर अशा चार टप्प्यात मतदान होईल. २३ डिसेंबरला निकाल घोषित करण्यात येईल. झारखंड विधानसभेची मुदत ३ जानेवारीला तर काश्मीर विधानसभेची मुदत १९ जानेवारीला संपत आहे.