काही राजकारणी सत्तेसाठी पक्षाच्या मागे धावत असतात, पण काही राजकारणी असे असतात की सत्तेचे गणित जुळवण्यासाठी पक्षांना त्यांच्या मागे धावावे लागते. महाराष्ट्राच्या राजकाराणातील डॉ. विजयकुमार गावित हे एक असे खेळाडू आहेत, त्यांचे सारे राजकारण हे स्वंयकेंद्रीत आहे. आता त्याचा विस्तार कुटुंबापर्यंत झाला आहे. मुलगी खासदार झाल्यानंतर आता स्वत गवित आणि त्यांचे दोघे बंधू वेगवेगळ्या पक्षातून राजकीय भवितव्य अजमावत आहेत.
नंदुरबार हा तसा अलीकडेच्या झालेल्या लोकसभा निवडणुर्कीयत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गांधी-नेहरू घरण्याचा हा लाडका मतदारसंघ. सबकुछ काँग्रेस अशी १९९५ पर्यंत परिस्थिती होती. त्याला पहिला धक्का दिला तो डॉ. गावित यांनी. गवित यांच्या घराण्यावरही काँग्रेसचे राजकीय संस्कार झालेले. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या गावित यांनी राजकारणात प्रवेश करण्याकरिता १९९५ मध्ये काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने त्याला नकार दिल्यानंतर गावित अपक्ष म्हणून मैदानात उतरले. काँग्रेसचा पराभव केला. गावित अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्याचवेळी युतीचे सरकार आले. त्यावेळी अपक्षांचा भाव भलताच वधारलेला होता. त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. तेव्हापासून गवितांचे स्वंयकेंद्रीत राजकारण सुरु झाले.
काँग्रेसला खिळखिळे करण्यासाठी गावित यांच्यासारखा मोहरा राष्ट्रवादी काँग्रेसला हवा होता. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत गावित राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. निवडून आले आणि मंत्रीही झाले. मात्र त्यानंतर निराधार योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांना विरोधकांनी घेरले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आघाडी सरकारमधील चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण केले, त्यापैकी गावित एक होते. न्या. पी.बी. सावंत आयोगाने त्याची चौकशी केली. गावितांवर आयोगाने भ्रष्टाचाराचा थेट आरोप केला नाही, परंतु गलथान प्रशासकीय कारभाराचा ठपका त्यांच्यावर ठेवला. राष्ट्रवादीने तेवढय़ा तांत्रिक मुद्यावर त्यांना अभय दिले. काँग्रेसला नंदुरबार मतदारसंघातून हद्दपार केल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी गावित यांचे तोंडभरुन कौतुक केले. पुढे २००४ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत गावित चढत्या मताधिक्याने विजयी होत गेले.
भाजपने विजयकुमार गावित यांच्यविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि अचानकपणे गावित यांची कन्या हिना गावित यांचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांच्या यादीत नाव झळकले. आता विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार
म्हणून नंदुरबारमधूनच लढत आहेत. त्यांचे अन्य दोन बंधू आणखी वेगळ्याच पक्षातून निवडणूक लढवित आहेत. पक्ष कोणता हा त्यांच्यादृष्टीने गौण प्रश्न आहे. सत्तास्थानावर राहणे हा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. सत्तास्पर्धेतील हा धावपटू पुढे असतो, पक्ष त्यांच्या मागे फरपटत जातात. आधी अपक्ष, मग राष्ट्रवादी आणि आता भाजप. – मधु कांबळे