दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्हय़ात या वेळी अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. बारापैकी पाच जागा पक्षाने जिंकल्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दिग्गजांसह काँग्रेसने तीन जागा कायम राखल्या, राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली. शिवसेनेची या निवडणुकीत वाताहत झाली. नगर शहरातील शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याला राष्ट्रवादीने सुरुंग लावला. राष्ट्रवादीतून ऐनवेळी भाजपत गेलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते पराभूत झाले.
नगर शहरात तब्बल पंचवीस वर्षांनी परिवर्तन झाले. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांना १९९५ पासून सलग पाच विजयानंतर या वेळी पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर संग्राम जगताप यांनी त्यांचा ३ हजार ३१७ मतांनी पराभव केला. कोपरगावची जागाही शिवसेनेला गमवावी लागली. येथे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांनी शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आशुतोष यांचा पराभव केला. या निवडणुकीत केवळ पारनेर (आमदार विजय औटी) मध्येच शिवसेनेचे अस्तित्व टिकून राहिले.
राहुरी (आमदार शिवाजी कर्डिले), कर्जत-जामखेड (आमदार राम शिंदे) या दोन जागा जिंकतानाच भाजपने नेवासे (बाळासाहेब मुरकुटे) आणि शेवगाव-पाथर्डी (मोनिका राजळे) या राष्ट्रवादीच्या खात्रीशीर मानल्या जाणाऱ्या दोन जागा खेचून आणल्या. शंकरराव गडाख व चंद्रशेखर घुले या राष्ट्रवादीच्या दोन्ही मातब्बर उमेदवारांना येथे धक्कादायक पराभव झाला.
संगमनेर (माजी मंत्री बाळासाहेब थोरात), शिर्डी (माजी मंत्री राधाकृष्ण विखे) व श्रीरामपूर (आमदार भाऊसाहेब कांबळे) या तीन जागा काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे कायम राखल्या. अकोले येथील जागा माजी मंत्री वैभव पिचड यांचे चिरंजीव वैभव यांनी कायम राखली. या जागेसह नगर शहर (संग्राम जगताप) आणि श्रीगोंदे (राहुल जगताप) या दोन अनपेक्षित जागा राष्ट्रवादीला मिळाल्या.

Story img Loader