राजकारणी हा उत्तम अभिनेता असतो. अंगातील सदरा बदलावा इतक्या सहजपणे ते पक्षही बदलतात. लक्ष्य एकच असते, सत्ता. ‘सरकार’ म्हणून ओळखले जाणारे अजित घोरपडे हे याच पठडीतील एक राजकारणी. जनता पक्ष, अपक्ष, काँग्रेस, बंडखोर, असा प्रवास करीत आता त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याशी त्यांचा पहिल्यांदाच थेट सामना होत आहे.
आर. आर. आबा काँग्रेसच्या तालमीतून तयार झालेले राजकीय नेते. तर अजित घोरपडे यांनी १९८५ मध्ये काँग्रेसला आव्हान देतच राजकारणात प्रवेश केला. जनता पक्षातर्फे निवडणूक लढवून त्यांनी काँग्रेसच्या एकतर्फी विजयाला पहिल्यांदा लगाम घातला. त्यावेळी काँग्रेस उमेदवाराचा जेमतेम चार हजाराने विजय झाला. घोरपडे हे संस्थानिक घराण्यातील. त्यामुळे त्यांना ‘सरकार’ म्हणून ओळखले जाते. १९९० च्या निवडणुकीपर्यंत जनता पक्षाला उतरती कळा लागली होती, त्यामुळे पक्षाचे लेबल न लावता अपक्ष म्हणून ते लढले. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला, परंतु काँग्रेसपुढे त्यांनी आव्हान कायम ठेवले. १९९५ ला अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि काँग्रेसकडून त्यांनी विजय खेचून आणला. त्यावेळी महाराष्ट्रात सत्ताबदलही झाला. युतीचे सरकार आले, त्यात घोरपडे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील फूट त्यांच्या पथ्यावर पडली. दुसऱ्यांदा ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यावेळीही अपक्षांना फारच महत्व आले होते. दोन्ही काँग्रेसच्या सरकारात अपक्ष घोरपडेंना मंत्रीपदाचाही लाभ झाला. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली. कवठेमहंकाळ मतदारसंघ काँग्रेसला सुटला. त्यावेळी अजित घोरपडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले. मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. त्यामुळे ते अस्वस्थ होते. पुढे मतदारसंघ पुनर्रचनेत तासगाव-कवठेमहंकाळ एक मतदारसंघ झाला. आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेला आणि अर्थात आर.आर.पाटील हेच त्या पक्षाचे निर्विवाद उमेदवार झाले. त्यामुळे घोरपडे यांची पंचाईत झाली. काँग्रेसमध्ये रहावे तर मतदारसंघ नाही आणि राष्ट्रवादीमध्ये जावे तर उमेदवारी नाही. म्हणजे ‘सरकार’च कोंडीत सापडले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करुन त्यांनी राजकीय कोंडी फोडली. भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आर. आर. आबांचे कट्टर विरोधक संजयकाका पाटील यांनी भाजपची उमेदवारी घेतली आणि विजय खेचून आणून त्यांनी दोन्ही काँग्रेसला मोठा धक्का दिला. मोदी लाटेचा करिष्म्याने घोरपडेनांही मोहिनी घातली. काकांबरोबर त्यांनी जमवून घेतले आणि लगेच मतदारसंघभर पोस्टर्स झळकली, ‘अबकी बार घोरपडे सरकार’! अजित घोरपडे यांना भाजपने समारंभपूर्वक प्रवेश दिला आणि त्यांच्या उमेदवारीसाठी युती तुटण्याचीही फिकीर केली नाही. आता आम आदमीचा चेहरा असलेले आर.आर.आबा आणि संस्थानिकाचा बाज असलेले घोरपडे सरकार यांच्यातील ही लढाई उत्कंठावर्धक ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा