पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना २१ चेहऱ्यांचा समावेश केला. भाजपची भविष्यातील राज्यांमधील राजकीय गणिते तसेच प्रादेशिक भूमिकांचे संतुलन राखण्यावर या विस्तारात भर देण्यात आला आहे. शिवसेनेने शेवटच्या क्षणी शपथविधीवर बहिष्कार टाकला असला, तरी मित्रपक्षांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न विस्तारात करण्यात आला आहे. केंद्रात सत्तास्थापन केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तेथून राजीव प्रताप रूडी, गिरीराज सिंह, रामकृपाल यादव यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. यूपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळा उजेडात आणणारे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांना राज्यमंत्री बनवण्यात आले, तर अभ्यासू आणि कार्यक्षम अशी ओळख असलेले सुरेश प्रभू यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील शपथविधीत सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असा अंदाज बांधून शपथविधीपूर्वी प्रभू यांना भाजपचे सदस्यत्व देण्यात आले.
 शिवसेनेला काडीइतकेही महत्त्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनापूर्वक प्रभू यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या जखमेवर यामुळे शब्दश: मीठ चोळले गेले आहे. विस्तारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची संख्या ६६ झाली
आहे. मनोहर पर्रिकर यांच्या रूपात १९८७ नंतर पहिल्यांदाच गोव्याला कॅबिनेट मंत्री लाभला आहे.  उत्तर प्रदेशातील चार जणांना, तर बिहारमधील तीन खासदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून प्रत्येकी तीन जणांची मंत्रिपदासाठी निवड झाली.
आठ महिला मंत्री
रविवारच्या विस्तारात उत्तर प्रदेशातून निवडून आलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांच्या रूपाने एकमेव महिलेला स्थान मिळाले आहे. फत्तेपूरमधून त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील महिलांची संख्या ८ झाली आहे.
काँग्रेस नेते गैरहजर
शपथविधीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण होते, असे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव हेच विरोधी पक्षातील प्रमुख नेते शपथविधीला उपस्थित होते.

मनोहर पर्रिकर
गोव्याचे माजी मुख्यमंत्री, आयआयटीतून धातुशास्त्रातील अभियांत्रिकीची पदवी, साधेपणासाठी तसेच गोव्यातील जनसंपर्कासाठी प्रसिद्ध, मोदींचे कट्टर समर्थक

सुरेश प्रभू
अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री, सीएच्या परीक्षेत देशातून अव्वल, पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्यकाळात नदी जोडणी प्रकल्पाचे प्रमुख, बँकिंग क्षेत्रातील जाणकार, स्वच्छ प्रतिमा, मोदींचे विश्वासू, विस्तारापूर्वी भाजपमध्ये प्रवेश

विजय सांपला
पंजाबातील भाजपचा दलित चेहरा, प्लंबिंगसारखी कामे करून सामान्य पाश्र्वभूमीतून वर आलेले नेतृत्त्व.

हंसराज अहिर
महाराष्ट्रातील स्वच्छ चेहरा, ‘आदर्श खासदार’ अशा शब्दांत सोमनाथ चॅटर्जी यांच्याकडून गौरव, कोळसा खाणवाटपातील अनियमितता आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आणला, एकाच लोकसभेत २८८ खासगी विधेयकांपैकी २४ विधेयके एकटय़ाने मांडली

राजीव प्रताप रूडी
बिहारमधून प्रथम लोकसभेवर, पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्यकाळात वाणिज्य, व्यापार व उद्योग राज्यमंत्री,  सध्या भाजपचे सरचिटणीस

जयंत सिन्हा
माजी केंद्रीय अर्थ व परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव, ऊर्जा, उद्योग आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित धोरण आखणीतील तज्ज्ञ, आयकर भरण्यासाठीच्या ‘सरळ’ फॉर्मचे जनक,

मुख्तार अब्बास नकवी
पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्यकाळात माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री म्हणून अनुभव, भाजपचे विद्यमान उपाध्यक्ष, पक्षाचा प्रभावी मुस्लिम चेहरा,

जे.पी.नड्डा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्द सुरू, भ्रष्टाचारविरोधी लढय़ात विद्यार्थीदशेपासूनच सहभाग, हिमाचल प्रदेशाचे वने व पर्यावरण मंत्री तसेच विधी मंत्री म्हणून अनुभव, २०१२ पासून राज्यसभेवर

गिरीराज सिंह
मोदींचे खंदे समर्थक, नितीश कुमार यांचे विरोधक, जदयु-भाजप युती तुटल्यानंतर बिहार सरकारमधून हाकलपट्टी, मोदीविरोधकांनी पाकिस्तानात जावे या व यासारख्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत.