पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना २१ चेहऱ्यांचा समावेश केला. भाजपची भविष्यातील राज्यांमधील राजकीय गणिते तसेच प्रादेशिक भूमिकांचे संतुलन राखण्यावर या विस्तारात भर देण्यात आला आहे. शिवसेनेने शेवटच्या क्षणी शपथविधीवर बहिष्कार टाकला असला, तरी मित्रपक्षांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न विस्तारात करण्यात आला आहे. केंद्रात सत्तास्थापन केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तेथून राजीव प्रताप रूडी, गिरीराज सिंह, रामकृपाल यादव यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. यूपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळा उजेडात आणणारे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांना राज्यमंत्री बनवण्यात आले, तर अभ्यासू आणि कार्यक्षम अशी ओळख असलेले सुरेश प्रभू यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील शपथविधीत सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल, असा अंदाज बांधून शपथविधीपूर्वी प्रभू यांना भाजपचे सदस्यत्व देण्यात आले.
शिवसेनेला काडीइतकेही महत्त्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनापूर्वक प्रभू यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या जखमेवर यामुळे शब्दश: मीठ चोळले गेले आहे. विस्तारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची संख्या ६६ झाली
आहे. मनोहर पर्रिकर यांच्या रूपात १९८७ नंतर पहिल्यांदाच गोव्याला कॅबिनेट मंत्री लाभला आहे. उत्तर प्रदेशातील चार जणांना, तर बिहारमधील तीन खासदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून प्रत्येकी तीन जणांची मंत्रिपदासाठी निवड झाली.
आठ महिला मंत्री
रविवारच्या विस्तारात उत्तर प्रदेशातून निवडून आलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांच्या रूपाने एकमेव महिलेला स्थान मिळाले आहे. फत्तेपूरमधून त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील महिलांची संख्या ८ झाली आहे.
काँग्रेस नेते गैरहजर
शपथविधीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण होते, असे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव हेच विरोधी पक्षातील प्रमुख नेते शपथविधीला उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा