भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शहा आठवले यांच्याशी चर्चा करणार आहेत. थेट राष्ट्रीय अध्यक्षांनी लहान पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणे म्हणजे भविष्यात काही वेगळे निर्णय घेण्याची वेळ आलीच, तर महायुतीतील रिपब्लिकन पक्ष व इतर छोटय़ा पक्षांना भाजपसोबत ठेवण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी लवकर सुरू कराव्यात अशी आठवले सातत्याने मागणी करीत आहेत. परंतु त्या संदर्भात एखादा अपवाद वगळता, महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अजून एकही बैठक झाली नाही. त्याचवेळी राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोणाचा यावरून आताच भाजप व शिवेसना यांच्या कलगीतुरा सुरू आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा प्रश्न अद्याप अधांतरीच राहिला आहे. या पाश्र्वभूमीवर शहा यांनी आठवले यांना दिल्लीला बोलावले आहे. महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत त्यांच्याशी चर्चा होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.

Story img Loader