महाराष्ट्रात युती तोडायची आणि केंद्रातील मंत्रीपदाबाबत तोंडही उघडायचे नाही, हा शिवसेनेचा ढोंगीपणा असून त्यांच्यावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा असा राज ठाकरे यांचा सवाल सेनेच्या जिव्हारी बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते राजीनामा देतील, असे आज सेना नेतृत्वास जाहीर करावे लागले.
केंद्रातील सत्तेतून बाहेर पडणारी शिवसेना आता भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार असे संकेत मिळू लागले असून मुंबई महापालिकेच्या सत्तेतील भाजपसोबतच्या भागीदारीवर सेना काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपने महाराष्ट्रात युतीच्या चर्चेच्यावेळी शिवसेनेचा एवढा अपमान केला तरी शिवसेना गप्प का असा सवाल करत राज यांनी एकाचवेळी शिवसेना व भाजपला लक्ष्य केले आहे. बाळासाहेब असते तर महिनाभरापूर्वीच युती तोडून टाकली असती असे सांगत शिवसेना नेतृत्वावर थेट हल्ला करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेना हेच प्रमुख लक्ष्य राहील हेही त्यांनी दाखवून दिले आहे. महायुती व आघाडी तुटल्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा ही मनसेची रणनिती असून रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर व त्यावरील सेनेच्या टीकेवरून मनसेचे गटनेते व आमदार बाळा नंदगावर यांनीही सेनेवर नेम साधला आहे.
टीकेमुळे राजीनामा
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून रामदास आठवले यांच्यावर टीका करताना भाजपने केंद्रात मंत्रीपदाचे गाजर दाखविल्यामुळे आठवले भाजपसोबत गेल्याचे म्हटले आहे. परंतु सेनेनेही त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ देत सत्तेचा ‘सौदा’ केलाच होता, असा टोला नांदगावकर यांनी लगावला आहे. युती तुटून आठवडा उलटला तरी अनंत गिते हे केंद्रीय मंत्रीपद सोडणार की नाही, याबाबत शिवसेनेने मौन बाळगले होते. मात्र राज यांनी प्रचार सभेत थेट या मुद्दय़ाला हात घातल्यामुळे सेनानेतृत्वाला त्याची दखल घेत गितेंचा राजीनामा देण्याची वेळ आल्याचे बाळा नांदगावकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज ठाकरेंच्या टीकेचा बाण, अनंत गीतेंचे मंत्रिपद घायाळ !
महाराष्ट्रात युती तोडायची आणि केंद्रातील मंत्रीपदाबाबत तोंडही उघडायचे नाही, हा शिवसेनेचा ढोंगीपणा असून त्यांच्यावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा असा राज ठाकरे यांचा सवाल सेनेच्या जिव्हारी बसला आहे.
आणखी वाचा
First published on: 30-09-2014 at 02:11 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant geete to quit modi cabinet after raj thackeray attacks