केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशासाठी अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस, अमित शहा-उद्धव ठाकरे यांची चर्चा फिस्कटल्यानंतर विमानतळावरूनच माघारी फिरलेले देसाई, ऐनवेळी भाजपचे सदस्य बनून कॅबिनेट मंत्री बनलेले सुरेश प्रभू आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या राजीनाम्याबाबतची अनिश्चितता, या सर्व घडामोडींनी दिल्लीतील राजकीय वर्तुळात शिवसेनेला करमणुकीचा विषय बनवले.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला, शनिवारी  अनंत गिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली. मात्र, ती न मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून ते मुंबईला परतले. तेव्हा सेना एनडीएतून बाहेर पडेल, असे चित्र होते. परंतु, मध्यरात्र उलटून गेल्यावर  शपथविधीसाठी दिल्लीला जाण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना दिले. त्यानुसार देसाई सकाळी बाराच्या सुमारास दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मात्र मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी महाराष्ट्राबाबत अंतिम निर्णय घेण्याची सेनेची मागणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी फेटाळली. त्यामुळे देसाई यांना विमानतळावरूनच बोलावण्यात आले. विशेष म्हणजे, हे सर्व सुरू असताना ‘देसाई यांनाच मंत्रिपद का,’ अशी शिवसेना खासदारांची धुसफूस ही कानावर पडत होती.

 

 

Story img Loader