युती तोडायचीच, अशी चर्चेमध्ये भाजपची भूमिका होती का?
शिवसेनेचेच ‘मिशन १५१’ ठरले होते, त्यामुळे त्या आकडय़ाभोवती व मुख्यमंत्रिपदाभोवती चर्चा फिरत राहिली. भाजपला देऊ केलेल्या ११९ जागा तर आम्ही आतापर्यंत लढवीतच होतो. उलट युती झाली तेव्हा लोकसभेसाठी भाजपकडे ३२ व शिवसेनेकडे १६ जागा होत्या. प्रत्येक निवडणुकीत आमच्या जागा कमी होत त्या आता २६ पर्यंत आल्या व शिवसेनेच्या जागा वाढल्या. शिवशक्ती-भीमशक्ती युती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. तरी रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी घेण्याऐवजी शिवसेनेने ती आमच्यावर ढकलली. आमच्या विद्यमान खासदारांना डावलून आठवले यांना राज्यसभेची जागा देण्यात आली. युती टिकविण्याच्या हेतूनेच आम्ही हे सर्व केले. शिवसेनेने स्वार्थ साधून घेण्यासाठी आमचा उपयोग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उपयोग झाला, म्हणून तर शिवसेनेचे एवढे खासदार निवडून आले. लाट नसती तर आलेच नसते.
भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नसल्याने तो जाहीर केला जात नाही का?
भाजपमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची यादी मोठी होत आहे, ही टीका चुकीची असून आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, हेच यातून दिसून येते. िहमत असेल, तर दिवाकर रावते यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे घोषित करून दाखवावे.
मोदींची लाट नव्हती, असे शिवसेनेचे म्हणणे आहे?
मोदींचे नेतृत्व जर मान्य नसेल, तर केंद्र सरकारमध्ये शिवसेना कशाला राहिली आहे?
मोदी सांगतील तो मुख्यमंत्री, अशी भाजपची भूमिका आहे?
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे व लोकशाही कार्यपद्धती आहे. मोदी हे संसदीय मंडळाचे एक घटक आहेत आणि मंडळाकडून निर्णय होईल. शिवसेना प्रादेशिक पक्ष असून ‘उद्धव ठाकरे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशी परिस्थिती आहे. मोदींचे पोपट म्हणून आम्हाला खिजविणारे नेते मातोश्रीचे पोपट नव्हेत का?
मुख्यमंत्रिपद कोणाकडे असावे, या वादावर जागावाटपाची चर्चा अडली होती का?
मुख्यमंत्रिपदाचे सूत्र आधीच ठरले आहे. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री, असे सूत्र ठरले होते. त्यामुळे युती सरकार सत्तेवर आले, तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. ते पद त्यांनी भाजपला दिले नाही. विरोधी पक्षनेतेपदावरही त्यांनीच हक्क सांगितला होता. त्यामुळे त्यांचे गाडे १५१ आकडय़ाभोवती व मुख्यमंत्रिपदावरून फिरत राहिले. आम्हाला युती तोडायची असती, तर २० दिवस चर्चा कशाला केली असती?
भाजपचा पहिल्या क्रमांकाचा प्रतिस्पर्धी कोण असेल?
आम्हाला शिवसेनेशी स्पर्धा करायची नाही. आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशीच आहे.
मोदींची लाट विधानसभेसाठी पुन्हा निर्माण होईल का?
मोदींची लाट किंवा ताकद किती आहे, हे पुन्हा दिसून येईल. देशाच्या व राज्याच्या विकासाची संकल्पना घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत.
मराठी-गुजराती वाद निर्माण होत आहे?
अनेक गुजराती भाषकांना शिवसेनेने आतापर्यंत उमेदवारी दिली असून चंद्रिका केनिया या बऱ्याच वर्षांपूर्वी खासदार होत्या, तर राजकुमार धूत हे सध्या खासदार आहेत. गुजरातमध्ये मराठी भाषकांना चांगली वागणूक असून, सुरतमध्ये आतापर्यंत चारवेळा मराठी भाषक महापौर निवडून आले आहेत. मराठी शाळांना मंजुरी मिळते. भाषिक मुद्दय़ावर भांडणे लावण्याचे शिवसेनेचे काम आहे.
हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरील युती भाजपने तोडली, असे शिवसेनेचे म्हणणे आहे?
शिवसेनेचे िहदुत्व सोयीस्कर आहे. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. १९३५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यापक हिंदूुत्वासाठी स्थापन झाला. हिंदूुत्वाची मक्तेदारी शिवसेनेकडे नाही. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन केले, मग ते दक्षिण भारतीय बांधव िहदू नव्हते का? िहदूंविरोधात आंदोलन का केले? शिवसेनेच्या भूमिका स्वत:च्या सोयीने असतात व प्रादेशिक वाद पेटविण्याचे काम त्यांनी केले.
भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती आहे, असा शिवसेनेचा आरोप आहे?
आम्हाला जे करायचे असते, ते उघडपणे करू. छुप्या पद्धतीने काही करीत नाही. स्वबळावर सत्ता येईल, असा आम्हाला आत्मविश्वास आहे.
‘छत्रपतींचा आशीर्वाद..’ हे प्रयत्न भाजप कसे करू शकते?
छत्रपती शिवाजी महाराज हे काय एका कोणत्या पक्षाचे नाहीत किंवा ती शिवसेनेची मक्तेदारीही नाही. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचे नाव देऊन तेथे व संसदेच्या आवारात अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. शिवरायांवरील चलनी नाणे काढण्यात आले. व्हीजेटीआय तंत्र महाविद्यालयाचे नामकरण वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्था हे माझ्या मंत्रिपदाच्या काळात करण्यात आले. भाजप सरकारच्या काळात छत्रपतींच्या सन्मानासाठी अनेक निर्णय घेतले गेले.
सुरेश जैन यांना खडसे यांच्या हट्टामुळे तुरुंगात ठेवले गेले आहे?
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा मी मोठा आहे, असे शिवसेनेला म्हणायचे आहे का? या न्यायालयांनी जैन यांच्याविरोधात असलेले पुरावे पाहून जामीन नाकारला आहे. जैन यांनी अनेक निष्णात वकील दिले. पण उपयोग झाला नाही. माझा मुलगा निखिल हा विधान परिषदेची निवडणूक लढवत असताना सुरेश जैन यांनी युतीचा धर्मही पाळला नव्हता. कायद्यानुसार जे व्हायचे आहे ते होईल व मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा