आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितल्याच्या व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मुलगा पंकज सिंग याने लाच घेतल्याने त्याला पंतप्रधानांनी फटकारल्याच्या वृत्ताचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इन्कार केला आहे. आपण व आपल्या कुटुंबीयांवरील कुठलाही आरोप सिद्ध झाला, तर सार्वजनिक जीवन व राजकारण दोन्ही सोडून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रसारमाध्यमात अलीकडे येत असलेली माहिती ही खोटी असून त्यात काही तथ्य नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
जे लोक अशा अफवा पसरवीत आहेत ते देशाच्या हितास बाधा आणीत आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. राजनाथ सिंह यांच्या मुलाला त्यांच्यादेखत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटकारल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असेही कार्यालयाने सांगितले. राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत या आरोपांचा इन्कार केला. आपल्या मुलाने पोलीस अधिकाऱ्यांकडून बदलीसाठी लाच घेतली हे खरे नाही व त्याला पंतप्रधानांनी फटकारले हेही खरे नाही. दरम्यान याबाबत संघाच्या नेत्यांशी बोलल्याच्या वृत्ताचा राजनाथ सिंह यांनी इन्कार केला आहे.दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गृहमंत्र्यांच्या मुलावरील आरोपाचा निषेध केला आहे.
 विरोधकांची टीका
 काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितले की, सरकारने राजनाथ यांच्या मुलावरील आरोप नेमके काय आहेत ते सांगावे. राजनाथजींनी त्यांच्या मुलाविरुद्ध असलेले कुठले आरोप फेटाळले आहेत ते आता पंतप्रधानांनी सांगावे. आगीशिवाय धूर असत नाही. त्यांच्यावर आरोप झाले याचा अर्थ बऱ्याच काही गोष्टी असाव्यात. त्यांच्यात अंतर्गत भांडणे आहेत, अशी टिप्पणी भाकपचे डी. राजा यांनी केली.गृहमंत्र्यांच्या मुलाबाबत अफवा कोण पसरवत आहे हे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट करावे, अशी खोचक टीका माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. जनता दल संयुक्तचे नेते शरद यादव यांनी राजनाथ यांना पाठिंबा देताना त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे व ते स्वच्छ असल्याचे सांगितले.
वादाचे कारण?
आपल्या मुलाच्या विरोधात अफवा पसरवल्या जात असल्याची तक्रार राजनाथ सिंह यांनी संघाकडे केल्याचे वृत्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपस्थितीत आपल्या मुलाला पोलिसांच्या बदल्यांच्या मुद्दय़ावरून खडसावले हे खरे नाही. गेला महिनाभर राजकीय वर्तुळात ही अफवा असून पक्षांतर्गत हितसंबंधी पंकजला मोदींनी खडसावल्याच्या अफवा पसरवत आहेत. भाजपच्या अंतर्गत सूत्रांच्या मते, मोदी यांनी राजनाथ व पंकज यांना त्यांच्या कक्षात बोलावून फटकारले. पंकज सिंग यांना तुम्ही नेमके काय काम करता, असे विचारून मोदी यांनी त्याची झाडाझडती घेतली. जे पैसे पोलीस अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी घेतले ते परत कर, असे मोदी यांनी पंकज याला शांतपणे सांगितले. यापुढे तुझ्याविषयी पुन्हा अशी तक्रार येता कामा नये, असा सज्जड दमही मोदी यांनी पंकजला दिला. ज्या पद्धतीने ही बातमी पसरवण्यात आली त्याबाबत राजनाथ सिंह यांनी रा.स्व. संघ व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा